भारतभूमीचा विस्तार हिंदू राष्ट्रविचाराची मांडणी करताना हेच पहिले सत्य ते विस्ताराने विशद करीत असत. उत्तरेला हिमालयाच्या पर्वतराजीच्या ज्या समस्त शाखोपशाखा विस्तारलेल्या आहेत, तेथपासून तो दक्षिणेकडील सागरापर्यंत, तसेच पूर्व-पश्चिम सागरापर्यंत आपल्या या भूमीचा विस्तार आहे. अनेक प्राचीन ग्रंथांतील आधारांसह मोठया रसाळपणे आपल्या या सुनिश्चित सीमा असलेल्या भूमीचे अतिभावपूर्ण वर्णन ते करीत. नंतर ते या भूमीच्या एकेका कणात पावित्र्य कसे ओतप्रोतभरलेले आहे, हेही साधार सांगत. मातृभूमीच्या पावित्र्याचे वर्णन करताना त्यांच्या भावनांना उधाण येई व उंचबळणाऱ्या भक्तिभावनेने वाणीत अवर्णनीय आर्द्रता येई. ही भूमी म्हणजे जड दगडधोंडे नसून चैतन्यमय, जीवमान जगन्माताच आहे व तिचे अखंडत्व, मांगल्य, गौरव यांची प्राणपणाने जपणूक आपणया मातेच्या लेकरांनी केली पाहिजे, असा कर्तव्यबोध ते करून देत. आपल्या पूर्वजांनीकेलेला भारताचा विस्तार सांगताना - 'हिमवत्समुद्रान्तमुदीचीनं योजनासहस्त्र परिमाणम्' असे म्हटले गेले आहे. आर्य चाणक्याचे हे विधान आहे. तेव्हाच्या भारताचा विस्तारसांगताना ते म्हणत, आजच्या खंडित, आकुंचित भारतावरून आपल्या भूमिच्या सीमांची कल्पना करू नका. अफगाणिस्तान, इराण पूर्वी भारताचाच भाग होते. आजच्या इरावती नदीचे खोरे, ब्रह्मदेश, लंका यांचा समावेश भारतातच होता. कैलास ही तर देवांची निवासभूमी होती. सिंगापूर म्हणजे आपले शृंगपूर. ही भव्यता कुठे व आजचा संकोचलेला विच्छिन्न भारत कुठे ! ती भव्यदिव्य भारतमाता हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा गाभा व हिंदू राष्ट्राचे प्राचीन काळापासूनचे श्रध्दाकेंद्र होय.
No comments:
Post a Comment